किती आल्या किती गेल्या - १ *कमल*

लहानपणी कधी प्रेमात पडलाय? 

आई वडील, भाऊ बहीण यांच्या प्रेमात तर प्रत्येकजण प्रेमात पडतो. पण कधी लहानपणी एखाद्या अनोळख्या मुलीच्या किंवा मुलाच्या प्रेमात पडलाय?

मला पुसटसं आठवतंय. 

मी दुसरीत होतो. किमान त्या शाळेत तरी खूप हुशार विद्यार्थी म्हणून सगळ्या शिक्षकांचा आवडता विद्यार्थी. 

मोठया भावाबरोबर पाढे पाठ केलेले. अगदी तेंव्हा पाचवी पर्यंत इंग्लिश चा संबंध यायचा नाही. पण मी भावाबरोबर (मोठा भाऊ) ए बी सी डी - या इंग्लिश मधील सव्वीस अक्षरं तोंडपाठ असलेला चिमुकला पोरगा. पण तेवढाच वात्रट. एवढं सगळं पहिली दुसरीत असताना तोंडपाठ असलेला पोरगा म्हणून सगळे (अगदी शाळेतील शिक्षक) माझ्या वात्रटपणाकडे दुर्लक्ष करत असत. हे खरंय. मला थोडं आठवतंय आणि काही गोष्टी पप्पा आणि आईकडून ऐकलेल्या आहेत. हो चिमुकलाच होतो. अतिशय लहान चणी म्हणजे प्रकृती अगदी बारीक. उंची साधारण पोरांपेक्षा थोडी कमीच. आईचा घेतलेला गौरवर्ण. (आज चेहरा मात्र खूप काळवंडला आहे.) नेहमी तोंडावर हसू. पण मी माझ्याच विश्वात रमलेला.

मी आमच्या वर्गात पहिल्या रांगेत बसायचो. बेंच प्रकार नव्हता. खाली लांबलचक लाकडाच्या फळीवर आम्ही बसायचो. पहिल्या रांगेत बसून सुद्धा माझ्या खोड्या मात्र कधी कमी झालेल्या नव्हत्या. शिक्षक शिक्षिका प्रेमळ होते. त्यामुळे त्यांच्याकडून थोडा ओरडा खायचो पण तरीही कधीच त्यांनी मला छडी चा मार मात्र दिला नाही. इतर कुणाला छडीचा प्रसाद मिळाला असेल तर माहीत नाही. मी माझ्या विश्वात रमून जायचो. सगळा वर्ग माझा सखा होता. कधी एकटेपणा जाणवला नाही.

एकदा काही कारणाने आमचा दुसरीचा वर्ग तिसरीच्या वर्गातील मुलांबरोबर बसवला. कदाचित आमचे शिक्षक/शिक्षका आलेले नव्हते. आमचा वर्ग दंगा घालण्यात मग्न असताना आम्हाला तिथून उठवलं आणि तिसरीच्या वर्गात नेऊन बसवलं. आम्ही आमच्या वर्गात, जसं आणि ज्या रांगेत बसायचो तसंच त्या वर्गात आम्हाला बसवलं. म्हणजे मला पहिल्या रांगेत बसायचं होतं. मला एका मुलीच्या शेजारी बसायला लावलं. तेंव्हा या गोष्टीचं खरंच काहीही वाटलं नव्हतं की जसं आज पुरुष आणि स्त्री याबद्दल भावना आहेत तशा अजिबात नव्हत्याच. 

तिसरीच्या वर्गाबरोबर आमचीही शिकवणी चालू होती. मी भावाबरोबर नेहमी असल्याने आणि त्याला जे काही शिकवलं जातंय त्या गोष्टी लक्षात असल्यामुळे मी त्यात रमून गेलो होतो. (आठवतंय नक्की). 

त्या मुलीच्या शेजारी बसून खोड्या मात्र कमी झालेल्या नव्हत्या. एका शिक्षकांचं पोरगं, एका नामांकित हेडमास्तरांचा नातू आणि हुशार असल्यामुळे माझ्यावर शिक्षकांचं विशेष लक्ष असायचं पण माझ्या खोडयांकडे थोडं दुर्लक्ष करायचे. त्यामुळे माझी आणि त्या मुलीची गट्टी जमली. तिचं नाव कमल आहे हे त्याच दिवशी कळालं. 

खरंच आजही आठवतंय तिचं नाव. फक्त नाव. ती कशी दिसायची हे मात्र आता आठवत नाही. मधल्या सुट्टीत आम्ही दोघांनी एकत्र डबा खाल्ला. आम्ही एकमेकांत इतकं चटकन मिसळून गेलो की जसं खूप आधी पासूनची ओळख होती. 

त्या पहिल्याच दिवशी, आमच्या दोघांत कोणते बंधन निर्माण झाले ते मात्र माहीत नाही. मी शाळेत गेलो की माझ्या वर्गात जाऊन बसण्याऐवजी तिच्या वर्गात तिच्या शेजारी जाऊन बसायला लागलो. शिक्षक मला माझ्या वर्गात नेऊन बसवायचे पण तिथं मी भोकाड पसरायचो त्यामुळे शिक्षक वैतागून मला तिच्या शेजारी बसायला परवानगी द्यायचे. त्यावर उपाय म्हणून कमललाच माझी समजूत काढायला सांगून मला माझ्या वर्गात बसायला भाग पाडायचे. आणि मी तिचं प्रामाणिकपणे ऐकायचो. 

एकदा आमची खूप लांबची सहल काढली. म्हणजे सगळ्या शाळेची. खूप लांबची म्हणजे कुठे नेलं होतं ते नक्की आठवत नाही. कदाचित आमची वयं लक्षात घेता जवळच एखाद्या बागेत नेली असेल. तिथून तिसरीच्या आणि चौथीच्या वर्गातील मोजक्या मुलांच्या घरी आम्हाला नेण्यात आलं होतं. कुठला सण असेल की काय ते आठवत नाही. एका शिक्षकांच्या घरीही गेलो होतो. तसेच शेवटी कमलच्याही घरी गेलो होतो. मला खरंच खूप आनंद झाला होता. थोडं थोडं आठवतंय तिने तिच्या आई वडील यांची माझी ओळख करून दिली होती. बाकी खाणं पिणं आणि त्या पोरकट गप्पा व खोड्या झाल्यावर आम्ही आमच्या घरी परतलो होतो. 

एकदा असंच सुट्टीच्या दिवशी कमलची मला खूप आठवण आली म्हणून मी घरात कुणालाही न सांगता तिच्या घरी गेलो. (आज असं वाटतंय की तेंव्हा मी खूपच मोठं धाडस केलं होतं.) कदाचित दिवाळीच्या सुट्टीत असेल. तिने तितक्याच आपुलकीने माझं स्वागतही केलं. मला खाऊ पिऊ घातलं. आम्ही काही गप्पा मारल्याही असतील. त्या मात्र आठवत नाहीत. कमलच्या घरी अचूक जाणे हे माझ्या मनात आजही कोरून राहिलंय. आपण जेंव्हा एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो तेव्हा आपण अगदी बारीक सारीक गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवतो. तसाच हा प्रकार होता असं मला तरी वाटतं. 

दुसरीत नेहमी सारखा पहिल्या क्रमांकाने पास झालो आणि तिसरीच्या वर्गात गेलो. जसं मी वरच्या वर्गात गेलो तसं कमलही चौथीत गेली. आमच्या शाळेचा चौथीचा वर्ग मात्र वेगळ्या ठिकाणी भरायचा. कुठे होता हे मात्र कधीच कळालं नाही. कमल दुसरीकडे शिकायला गेली इतकंच मला माहीत होतं. मला खूपवेळा कमलला भेटायची इच्छा व्हायची पण तिचा वर्ग कुणीकडे होता हेच मला कळालं नाही. म्हणून पुन्हा एकदा (तेंव्हाचं धाडस करून) मी तिच्या घरी तिला भेटायला गेलो. 

पण कमलची भेट झाली नाही. त्यांनी घर बदललं होतं. तिथे जे कुणी राहत होते त्यांनी सांगितले की कमल दुसरीकडे राहायला गेलीय आणि त्यांना त्याबद्दल माहीत नाही. 

खरं सांगतो, हा माझ्या इतक्या लहान वयात मिळालेला पहिला धक्का होता. मी तिथून घरी कसा परतलो किंवा माझ्या मनाची तेंव्हा काय अवस्था होती ते आठवत नाही. पण आतून तुटलो होतो नक्की.

कमल माझी सखी होती. ती माझ्यापेक्षा साधारण एक वर्षांनी मोठी होती. तरी तिला कधीच मी ताई, आक्का अशी हाक मारली नव्हती. नेहमी कमल याच तिच्या नावाने बोलवायचो. आमचं नातं आणि आमचं प्रेम वेगळं होतं. त्याला आजही कोणतंही नाव देता येत नाहीय. खूप प्रेमळ होती कमल. 

आता ती कुठे आहे किंवा तिचं आयुष्य कसं पार पडलं असेल हे मला कधीच कळू शकणार नाही. कदाचित तिला यातील काहीही आठवतही नसेल. 

जवळपास पंचेचाळीस वर्षांपूर्वीच्या या गोष्टी कमलला आठवत असतील की नाही, याचीही मला अपेक्षा नाही. 

पण मी त्या नकळत्या वयात खरंच मनोमन प्रेम केलं. अगदी माझ्या न कळत. 


Comments