Posts

किती आल्या किती गेल्या - १ *कमल*

लहानपणी कधी प्रेमात पडलाय?  आई वडील, भाऊ बहीण यांच्या प्रेमात तर प्रत्येकजण प्रेमात पडतो. पण कधी लहानपणी एखाद्या अनोळख्या मुलीच्या किंवा मुलाच्या प्रेमात पडलाय? मला पुसटसं आठवतंय.  मी दुसरीत होतो. किमान त्या शाळेत तरी खूप हुशार विद्यार्थी म्हणून सगळ्या शिक्षकांचा आवडता विद्यार्थी.  मोठया भावाबरोबर पाढे पाठ केलेले. अगदी तेंव्हा पाचवी पर्यंत इंग्लिश चा संबंध यायचा नाही. पण मी भावाबरोबर (मोठा भाऊ) ए बी सी डी - या इंग्लिश मधील सव्वीस अक्षरं तोंडपाठ असलेला चिमुकला पोरगा. पण तेवढाच वात्रट. एवढं सगळं पहिली दुसरीत असताना तोंडपाठ असलेला पोरगा म्हणून सगळे (अगदी शाळेतील शिक्षक) माझ्या वात्रटपणाकडे दुर्लक्ष करत असत. हे खरंय. मला थोडं आठवतंय आणि काही गोष्टी पप्पा आणि आईकडून ऐकलेल्या आहेत. हो चिमुकलाच होतो. अतिशय लहान चणी म्हणजे प्रकृती अगदी बारीक. उंची साधारण पोरांपेक्षा थोडी कमीच. आईचा घेतलेला गौरवर्ण. (आज चेहरा मात्र खूप काळवंडला आहे.) नेहमी तोंडावर हसू. पण मी माझ्याच विश्वात रमलेला. मी आमच्या वर्गात पहिल्या रांगेत बसायचो. बेंच प्रकार नव्हता. खाली लांबलचक लाकडाच्या फळीवर आम्ही बसायच...